राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त…..

नमस्कार,

सर्वप्रथम गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना व्यसनमुक्त भारताचे पुरस्कर्ते म्हणून आपण ओळखतो. महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त सारथी युथ फौंडेशन, सोलापूर अंतर्गत चालविल्या जात असलेल्या व्यसनमुक्ती प्रकल्पामधील एक सत्य अनुभव कथा आपणासमोर मांडत आहे.

स्वत: साठी तंबाखू व्यसनमुक्त होताना…

लोधी गल्ली सोलापूर शहरातील असे ठिकाण जिथ मोठ्याप्रमाणात विडी बनविणार्‍या कामगारांची घरे आहेत. विडी कामगार कुटुंबातील अनेक महिला व मुली सदर काम करताना दिसतात. त्यांच्यासाठी ते रोजगाराचे साधन आहे. काही दिवसांपूर्वी विडी कामावर बंदी आणण्यात आली होती तेव्हा अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. कुटुंबाची गुजराण कशी करावी या प्रश्नावरती पर्याय दिसेना तेव्हा सोलापुरातील काही विडी कामगारानी आत्महत्या करणे हा पर्याय निवडला. काही आत्महत्या झाल्या तर काहींनी आत्महत्येचे प्रयत्न केले. एकीकडे रोजगारचा प्रश्न तर दुसरीकडे तंबाखू व्यसनाचे वाढते प्रमाण अशा दोन टोकाच्या बाजू. घरातील महिला विडी बनवतात तर बहुतांश पुरुष वर्ग विविध प्रकारांच्या व्यसनात गुंग असतात. अशावेळी व्यसनमुक्ती कार्यक्रमाची गरज निर्माण झाली. सारथी युथ फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, केंद्र लोधी गल्ली येथे तंबाखू व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तंबाखू व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमास एक-एक व्यक्तीस बोलावून घ्यावे लागले. महिला विडी बनविण्यात व्यस्त असल्याने त्या कमी-अधिक प्रमाणात सहभागी झाल्या. बुधवार हा त्यांचा सुट्टीचा दिवस. काही तरुणांना कट्ट्यावर बसण्याएवजी कार्यक्रमात येऊन बसा अशी विनंती केल्यानंतर एक-एक युवक कार्यक्रम ठिकाणी येऊन बसू लागले. कार्यक्रमात उपस्थित युवकांना तंबाखू व्यसन काय असते, व्यसन लागण्याची कारणे, त्याचे दुष्परिणाम, व्यसमुक्तीसाठी उपाययोजना याविषयावर त्यांना समजेल अशा शब्दांमध्ये मार्गदर्शन करण्यात्त आले. मार्गदर्शन कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना विचारले, “आपणापैकी कितीजण तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करता?” त्यावेळी उपस्थित 40 हून जास्त व्यक्तिपैकी 50% व्यक्तींनी हात वर केले. यावरून हा विषय त्यांच्यापर्यंत पोहचणे किती गरजेच होत हे समजले. हात वर केलेल्यापैकी काही व्यक्तींना तंबाखू सोडायची आहे तर काहींना याबाबतीत काहीच मत व्यक्त कारायचे नाही हे समजले. ज्यांना सोडण्याची इच्छा आहे त्यांना तंबाखू सोडण्यासाठी कसे पर्याय निवडता येतील हे सांगण्यात आले. सोबतच गरजेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय दवाखान्यात पाठविण्यात आले. समुपदेशनासाठी सारथीचा संदर्भही देण्यात आला. कार्यक्रम संपल्यानंतरही काही युवक प्रश्न विचारून माहिती पुन्हा जाणून घेत होते. एक युवक कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सर्वांच्या पुढे बसून सर्व माहिती गंभीरतेने समजून घेत होता. कार्यक्रम संपल्यानंतर येऊन भेटला. म्हणाला, “मला थोडी माहिती घ्यायची आहे परंतु मी तुम्हाला नंतर आपल्या कार्यालयात येऊन भेटतो.”

दोन दिवसानंतर सारथीच्या नंबर वरती फोन आला. “सर मी तुम्हाला कार्यक्रमात भेटलो होतो. मला तुम्हाला भेटायचे आहे.” दिलेल्या वेळेला तो सारथी कार्यालयात आला. समुपदेशना दरम्यान समजले की तो वयाच्या 14 व्या वर्षापासून तो गुटखा, मावा खातो आहे. गुटख्यावर बंदी आली म्हणून तो सध्या मावा खातो आहे. कार्यक्रमा दरम्यान दाखवण्यात आलेल्या चित्रामुळे तो थोडा घाबरला होता. सध्या त्याचे वय 26 आहे. तोंडामध्ये गरे येण, जेवणाची चव न समजणे, तोंड उघडण्यास अडचण होण असे त्रास त्याला अधून-मधून जाणवत होते. गुटखा, मावा सोडण्याचा त्याने खूप प्रयत्न केला होता परंतु ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करणारांची संख्या जास्त आहे. त्याने जरी सोडण्याचा प्रयत्न केला तरी कोणीतरी त्याला पुन्हा व्यसन करण्यास प्रवृत्त करतात.

कार्यक्रमात सांगितल्याप्रमाण तंबाखू व्यसन सोडण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. त्यानुसार ठाम निर्णय घेऊन त्याने मावा सोडण्याचा प्रयत्न देखील सुरू केला होता. कार्यक्रमानंतर आत्तापर्यंत स्वत: वर ताबा ठेऊन त्याने मावा खाल्ला नव्हता. यादरम्यान काहींनी त्यास पुन्हा मावा खाण्यास प्रवृत्त केले परंतु यावेळी त्याने साफ नकार दिला होता. त्याच्या या निर्णयाचे कौतुक करून त्यास पुढे प्रोत्साहित करण्यात आले. पुढेही असाच प्रयत्न करून तंबाखू जन्य पदार्थापासून दूर राहण्याचा विश्वासही त्याने दर्शविला.

दरम्यान एक इच्छा त्यांनी व्यक्त केली की, “मी आपणास स्वतंत्र का भेटण्यास आलो? कारण मला समाजातील लोकांसमोर या विषयावर बोलण्यास शरम वाटली. मला इतरांना कळू ही द्यायचे नाही की मी आपणाकडे व्यसन सोडविण्यसाठी आलो आहे. याआधी मी बर्‍याच वेळा व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला होता, तो प्रयत्न फसला तेव्हा समाजातील इतर लोक माझ्यावर हसले होते. आता मी स्वत: साठी व्यसन सोडण्याच प्रयत्न करतो आहे. कृपया ही माहिती कोणाला सांगू नका.” यावेळी त्याच्या नावाच्या गोपनीयतेबाबत विश्वास देण्यात आला.

खर्‍या अर्थाने कार्यक्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. एक व्यक्ति व्यसनापासून दूर गेला तर तो समाजातील इतर व्यक्तींचा आदर्श ठरतो. ज्यावेळे तो व्यसनास नकार देतो तेव्हा इतरांनाही तो कसा व्यसनापासून दूर जातो आहे हे जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. साहजिकच व्यसनमुक्त व्यक्ति समाजातील व्यसनमुक्ती चळवळीचा भाग बनून जातो. खरी गरज आहे ती युवकांनी समाजातील तंबाखू व्यसन दूर करण्यासाठी स्वत: व्यसनमुक्त राहण्याची आणि इतरांना व्यसनमुक्त करण्याची.

चला या चळवळीचा भाग बनूया, समाजातून तंबाखू व्यसन हद्दपार करूया.

-रामचंद्र वाघमारे 9096426241 (सारथी युथ फौंडेशन, सोलापूर)

Posted in Uncategorized.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *