समाजकार्याची आवड तर होती पण नेमक काय कराव? या संभ्रमात मी होते. माझ शिक्षण तर यातच सुरू आहे मग मी अस काय करू ज्याच्यातून मी समाजासाठी काही तरी करू शकेन? यातच मे महिन्यात माझ्या मित्राचा शोएब शेख यांचा मला फोन आला. त्यांनी मला सारथी यूथ फौंडेशन सोलापूर मधील फेलोशिपबद्दल सांगितले. फेलोशिपच ऐकून कुठे तरी माझ्या प्रश्नाच उत्तर मला मिळाल होत. म्हणून मी फेलोशिपसाठी अर्ज करायच ठरवल. सारथीचे सचिव श्री रामचंद्र वाघमारे सर यांच्याशी बोलले. त्यांनी मला मुलाखतीची दिनांक आणि वेळ सांगितली. मला फेलोशिपच समजल त्यावेळेस कॉलेजला सुट्ट्या चालू असल्यामुळे मी गावी होते. मूलाखतीला जाताना मनात खूप विचार येत होते. मुलाखत कशी होणार? काय प्रश्न विचारतील? माझी निवड तर होईल ना? हे सगळे प्रश्न घेऊन मी मुलाखतीसाठी सारथीच्या कार्यालयात पोहोचले. मुलाखत हे सारथीचे सचीव श्री रामचंद्र वाघमारे सर घेणार होते. त्यांनी मुलाखतीला सुरुवात केली आणि माझ्या काळजाचे ठोके वाढले. मुलाखत तर चांगली गेली पण निबड होईल की नाही? हा मोठा प्रश्न होता. त्यांनी निवडीबद्दल लवकर कळवतो असे सांगितले होते. त्यामुळे मनात उत्सुकता लागली होती. जून महिन्याच्या शेवटी सरांशी बोलण झाल त्यावेळेस त्यांनी उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर साठी फेलोची निवड करायची आहे असे सांगितले. तुम्ही या तालुक्यांसाठी तयार आहात का? असा प्रश्न विचारल्यानंतर मी होकार दिला.
त्याच दिवशी सरांनी आम्हाला कार्यक्रम कसे घ्यायचे? आपल मत कस पटवून द्यायच? याच ट्रेनिंग दिल. त्याचप्रमाणे तंबाखू व्यसनमुक्तीचे कार्यक्रम कोठे कोठे घ्यायचे आहेत? त्याच नियोजन कशापद्धतीच आहे? याची पूर्ण माहिती दिली. सरांनी ट्रेनिंग दिल त्याचबरोबर कार्यक्रमासाठी लागणारे साहित्यही दिले. पण शाळेमध्ये जाऊन सादरीकरण करण्याअगोदर ते सरांसमोर सादरीकरण करून दाखवायचे होते. ज्यामुळे इतरांपर्यंत चुकीची माहिती जाऊ नये. तसेच आम्ही कशापद्धतीने सादरीकरण करतो आणि त्यात कोणकोणत्या उणीवा आहेत हे जाणून घेणे गरजेचे होते. अभ्यास करून सरांसमोर सादरीकरण केले त्यावेळेस सरांच सूक्ष्म निरीक्षणाचा अनुभव आला. माझ्या सदरीकरनात अशा खूप साऱ्या गोष्टी दिसून आल्या ज्यात मला बदल करणे गरजेचे होते.
सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी बदल करत गेले. त्या गोष्टीचा फायदा मला कार्यक्रम घेताना झाला कारण कार्यक्रम शाळा-महाविद्यालय आणि समुदाय स्तरावर घ्यायचे होते. वयोगट सुद्धा वेगवेगळा होता. मग त्यांना एकाच पट्टीमध्ये सांगणे योग्य नव्हते. वयोगटानुसार आपल्याला सांगता आलं पाहिजे त्यासाठी आपल्यामध्ये आवाजाचा चढउतार, बोलण्याची पद्धत, समोरच्याला समजून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टी असल्या पाहिजेत. हीच गुणकौशल्ये समाजकार्यात खूप महत्त्वाची असतात असे सर नेहमी म्हणत. याचा पुरेपूर अनुभव मी घेतला आहे. कारण ज्या वेळेस मी शाळेत कार्यक्रमाची परवानगी घेण्यासाठी जात होते तेव्हा मला कधीकधी परवानगीही खूप सहजासहजी मिळत असे पण काही वेळेस परवानगी घेण्यासाठी त्यांना या कार्यक्रमाची गरज का आहे? हे पटवून द्यावे लागत असे. त्यामुळे विद्यार्थी असो किंवा शिक्षक त्यांना आपलं मत कितपत पटवून देऊ शकतो हे महत्त्वाचे असते.
शाळेमध्ये कार्यक्रम घेत असताना काही वेळेस मला असे अनुभव आले ज्यामुळे मी खचून जात असे. रागही खूप येत होता. कारण मला वाटायचे तंबाखू व्यसन हा इतका गंभीर प्रश्न असूनदेखील याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही. काही शाळांमध्ये तर शिक्षकांकडून नकारात्मक दृष्टिकोन दिसून येत त्यामुळे निराशा निर्माण होई. पण त्यावेळेस आपण नेमकं काय केलं पाहिजे हे वाघमारे सर समजावून सांगत. येणारा प्रत्येक अनुभव हा सारखाच असेल असे नाही तर आपण येणाऱ्या प्रत्येक अनुभवासाठी तयार असले पाहिजे हे महत्त्वाचे.
ज्या पद्धतीने शाळेमध्ये कार्यक्रम घेतले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी देखील घेतले. महाविद्यालयीन स्तरावर कार्यक्रम घेताना मनामध्ये खूप भीती वाटत असे. विद्यार्थी आपल्याला प्रतिसाद देतील का? शिक्षकांचा दृष्टिकोन कसा असेल? मी कार्यक्रम घेऊ शकेन की नाही? पण खरोखरच महाविद्यालयीन कार्यक्रमाचे अनुभव हे खूप वेगळे होते. मला ज्या गोष्टीची भीती वाटत ते होतच नसे. तिथले शिक्षक खूप सहकार्य करत, विद्यार्थी सहकार्य करत. एवढेच नव्हे तर विद्यार्थी आपण व्यसनी आहोत हे मान्य देखील करत. विद्यार्थ्याँना जाणिव होती की आपण चुकीचं करतोय. आणि शिक्षक यांना योग्य वाटेवर आणण्यासाठी प्रयत्न करत असे. काही ठिकाणी शिक्षकांनी स्वतः मान्य केले की आमचे व्यसन सुटत नाही आम्ही काय करू देत. विद्यार्थ्यांना आम्ही कसं सांगू जेव्हा आम्हीच व्यसनी आहोत. आमच देखील तुम्ही समुपदेशन करा आम्हालाही व्यसन सोडायचे आहे.
म्हणजे शाळा आणि महाविद्यालय स्तरावर जसे चांगले अनुभव आले तसेच वाईट अनुभव आले. पण प्रत्येक अनुभव मला खूप काही शिकवून गेला. माझ्या गुणांमध्ये बदल करत गेला. कार्यक्रम घेताना असं नाही की फक्त शिक्षकांची ओळख झाली सोबतच अधिकाऱ्यांची देखील ओळख झाली कारण सलाम मुंबई फाऊंडेशन आणि सारथी यूथ फाउंडेशन मिळून सोलापूर जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यासाठी एकत्रितपणे काम करत होते. त्यामुळे मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी ओळखी वाढत होत्या. कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळांना ११ निकषाबद्दल माहिती देत होतो, त्यांचे निकष पूर्ण आहेत की नाहीत याची पूर्तता करून घेत होतो.
पण ज्यावेळेस समुदायस्तरावर तंबाखू व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेतला तेव्हा मात्र मला अनपेक्षित असे सहकार्य मिळे. कारण जेव्हा मी गणपती मंडळ आणि नवरात्र मंडळ मध्ये हे कार्यक्रम घेतले तेव्हा पालकांना पोस्टरच्या माध्यमातून तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम, त्याचा आपल्या कुटुंबावरती, आपल्यावरती कसा परिणाम होतो, आजार कसे होतात अशी वेगळी माहिती दिल्यानंतर त्यांच्यामध्ये तंबाखू सोडण्याची इच्छा दिसून आली. एवढेच नाही तर त्यावेळेस वेगवेगळ्या समुदायात कार्यक्रमासाठी परवानगी घेत तेव्हा ते उत्स्फूर्तपणे परवानगी देत आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडत. आजची युवा पिढी तंबाखू व्यसनाबद्दल किती जागरूक आहे याची सुद्धा जाणीव होत. एवढेच नाही तर ते लोक दुसऱ्या लोकांना कार्यक्रम आयोजनाबद्दल सांगत.
प्रत्येक स्तरांमध्ये, वयोगटामध्ये कार्यक्रम घेताना इच्छाशक्ती अधिकाधिक प्रबल होत जात. मनामध्ये खात्री असे की आपण अधिक चांगलं करू शकतो. खरंच या फेलोशिपच्या माध्यमातून माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा गुणांची खूप भर पडली आहे. हे गुण फक्त फेलोशिपसाठी नव्हे तर भविष्यकाळात नोकरी करताना खूप महत्त्वाची ठरतील. वाघमारे सर नेहमी म्हणत समाजाकार्यामध्ये काम करताना संयम, धीर, रागावरती नियंत्रण, परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ही सर्व कौशल्ये अंगी बाळगली पाहिजे तेव्हाच आपण समाजकार्य करू शकू.
खरंच आज मी खूप खुष आहे की सारथी यूथ फौंडेशन सोबत जोडले गेले. सारथीने मला आजपर्यंत खूप काही दिले. माझ्या ज्ञानात भर पडली. माझ्या वेगवेगळ्या शंकांचे निरसन केले. जेव्हा मी खचून जात तेव्हा मला पुन्हा उभा करण्याचं आणि माझ्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम सारथीन केल. आज मी सारथीची शतशः ऋणी आहे. आणि ऋणी आहे ते म्हणजे शोएब शेख यांची त्यांनी मला रस्ता दाखवला नसता तर आज मला एवढं सगळं बोलता आलं असतं.
सारथीच्या याच आपलेपणाच्या भावनेमुळे आयुष्यभर सारथीसोबत राहून कार्यरत राहण्याची इच्छा आहे.
– आस्मा पटेल (फेलो – तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्प, उत्तर सोलापूर)